आले उत्पादक कमी भावामुळे संकटात; नवीन लागवड अत्यल्प
कडेगाव (जि. सांगली) : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर व अवकाळीमुळे आले पिकाचे जमिनीखालीच कुज, करपा आदीमुळे आर्थिक नुकसान झाले. सततच्या उतरत्या दरामुळे शेतकरी आणखी संकटात सापडले आहेत. प्रतिकिलो केवळ 12 ते 13 रुपये असा कमी भाव व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे. खर्चही निघत नसल्याने आले उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.
तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस पिकाला फाटा देत आले पिकाची मे व जून महिन्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली. शेती मशागत, ठिबक सिंचन, हजारोंचे शेणखत तर महागडे बियाणे घेत एकरी तब्बल अडीच-तीन लाख रुपये खर्च केले. सुरवातीला निसर्गाने चांगली साथ दिली. लागवड करताना मे व जून महिन्यात आले पिकास पोषक वातावरण राहिले.
त्यानंतर बदलते हवामान व मुसळधार पावसाचा फटका पिकांना बसला. लाखो रुपये खर्च करून आले पिकाची केलेली लागवड जादा पाऊस व उष्ण वातावरणामुळे कुज होऊ लागल्याने आले उत्पादकांवर संकट कोसळले.
ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. कधी मुसळधार पाऊस, कधी अतिवृष्टी यामुळे तालुक्यातील येरळा व नांदणी या नद्यांसह, सर्व तलाव, ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. तर सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. पूर व अतिवृष्टीचे पाणी शेतात साचून राहिल्याने आल्याची मोठ्या प्रमाणात कुज होण्यास सुरवात झाली. बदलत्या वातावरणाचा फटकाही आल्याला बसला.
भरपाईची मागणी
आले पिकाला उतरत्या दराचा सामना करावा लागत आहे. प्रतिकिलो 12 ते 13 रुपये दर मिळत आहे. शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. खर्च केलेली रक्कम कशी वसूल होणार व पिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडणार या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शासनाने पाहणी करून मदत करावी, अशी मागणी आहे.
नवीन लागवडही अत्यल्प
यावर्षी आले पिकाला निचांकी भाव मिळत आहे. नवीन लागवडही अत्यल्प होत आहे. परिणामी बियाण्यासाठीही यावर्षी विशेष मागणी नाही.
- दीपक शेडगे, कडेगाव
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

